
फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ७० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी २७ रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले असून, त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

दि. ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत समता फाऊंडेशनच्या वतीने ताहा नगर, टीपू सुलतान चौक परिसरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी जळगाव येथील कांताबाई नेत्रालय येथील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभली होती. डॉक्टरांनी अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने रुग्णांची सखोल तपासणी केली.
शिबिरात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांपैकी २७ जणांना मोतीबिंदू असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व रुग्णांची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून, त्यासाठी लागणारी ने-आण व भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे. संबंधित रुग्णांना त्यांच्या घरातून नेऊन जळगाव येथे शस्त्रक्रिया करून पुन्हा सुरक्षितपणे घरी सोडण्यात येणार आहे.
या उपक्रमादरम्यान स्थानिक मान्यवरांचीही उपस्थिती होती. माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान शेख करीम आणि नगरसेविका सुमैया बी. शेख कुर्बान यांनी शिबिराला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच हाजी खलील अहमद, शेख मोहसिन यांच्या उपस्थितीत कुर्बान मेंबर यांच्या निवासस्थानी हे शिबिर पार पडले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेख मुजम्मील, रहमान, समीरभाई, गड्डूभाई, शोएब मनियार यांनी परिश्रम घेतले. तसेच कांताबाई नेत्रालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य करत शिबिर सुरळीत पार पाडले.



