जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय आयटीआय जवळून रस्त्याने पायी जात असतांना मित्रांशी फोनवर बोलतांना मागून दुचाकीवरुन आलेल्यांनी विद्यार्थ्याचा मोबाईल अज्ञातांना धुमस्टाईल लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील लासूर येथील विजयकांत कैलास कोळी हा विद्यार्थी केसीई महाविद्यालयात अभियांत्रीकीच्या दुसर्या वर्षाला शिक्षण घेत आहे. त्याने विद्युत कॉलनीत रुम केली असून तो तेथे परमेश्वर पाटील याच्यासोबत राहतो. सोमवारी १७ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास विजयकांत हा आयटीआय कॉलेजरोडवर जेवण्यासाठी जात होता. रस्त्याने पायी जात असतांना त्याला मित्राचा फोन आल्याने तो फोनवर बोलत चालत होता. याचवेळी मागून लाल रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दुचाकीस्वारांनी विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल हिसकावून त्याठिकणाहून ते पसार झाले. तरुणाने पळत दुचाकीस्वारांचा पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. याप्रकरणी तात्काळ मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.