धुळे प्रतिनिधी | कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी वापरले जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचेही प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभुमीवर महापालिकेमार्फत रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पहित्या टप्प्यात साडे सहा हजार इंजेक्शन मागविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.
काही दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो आहे. इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी बंगळुरू येथील मायलन कंपनीशी संपर्क साधला. त्यानुसार शहरातील बाधितांसाठी पहिल्या टप्प्यात लवकरच ६ हजार ५०० रेमडेसिविर इंजेक्शन मिळणार असल्याची माहिती देण्यात आली.
कोरोनाबाधितांना खासगी व शासकीय रुग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शन दिले जाते आहे. या इंजेक्शनची मागणी वाढल्याने त्याचा तुटवडा आहे. महापालिका आयुक्त अजिज शेख यांच्याकडे भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल व महापौर चंद्रकांत सोनार यांनी इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी केली हाेती. त्यानुसार आयुक्त अजिज शेख यांनी सकारात्मक भूमिका घेत रेमडेसिविर इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपनीला कार्यादेश देऊन इंजेक्शन घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार शहराला पहिल्या टप्प्यात सुमारे ६ हजार ५०० इंजेक्शन मिळणार असल्याची माहिती भाजप महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिली. लवकरच रेमडेसिविरचा साठा महापालिकेस प्राप्त होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.