धुळे प्रतिनिधी । दोंडाईचा शहरात गुन्हा दाखल करण्यावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून थेट पोलीस स्टेशनवरच हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांना गोळीबार करावा लागला.
याबाबत वृत्त असे की, एका मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून काल रात्री दोंडाईचा येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पिडीत मुलगी आणि आरोपी यांच्याशी संबंधीत असणार्या दोन गटांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. यात आरोपीच्या समर्थकांनी थेट दोंडाईचा पोलीस स्थानकावरच हल्ला चढविला. यामुळे काही काळ प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
संतप्त जमावाने पोलीस स्थानकात तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्यानंतर मात्र पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यात दोन जण जखमी झाले आहे. तर याप्रसंगी झालेल्या हाणामारीत एकाच मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली असली तरी पोलीस सूत्रांनी याला मात्र अद्याप दुजोरा दिलेला नाही.
या प्रकारानंतर दोंडाईचा शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. तर, पोलीसांनी हल्लेखोरांची ओळख पटवून धरपकड सुरू केली आहे.