जळगाव प्रतिनिधी । आजाराला कंटाळून धावत्या रेल्वेखाली तरूणीने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. घटना घडल्यापासून तीन तासांपर्यंत मृतदेह जागीच पडून होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, विद्यापीठातील कर्मचारी श्रीराम राजाराम चौधरी रा. आशाबाबा नगर यांची विधवा मुलगी धनश्री पंकज वसाणे (वय-42) ही त्यांच्याकडे राहत होती. आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घरात काहीही न सांगता रेल्वे बोगद्याकडे गेली. दुपारी 1 ते 1.30 वाजेच्या सुमारास रेल्वे खंबा क्रमांक 416 / 27-29 जवळ धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. दरम्यान ही तरूणी खंडेराव नगर बोगदा ते आशाबाबा नगर रेल्वे बोगदा जवळ रेल्वे लाईनवर फिरत असतांना काही नागरीकांनी हटकले होते. तिच्या जवळ एक पिशवी आढळून आली. त्यात झोपेच्या गोळ्यासह इतर औषधी आणि दोन बिसलरीच्या पाण्याच्या बाटल्या मिळून आल्यात. घटना दुपारी 1 वाजता घडल्यानंतर सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत तरूणीचा मृतदेह पडून होता. यावेळी खंडेराव नगर आणि हरीविठ्ठल नगरातील नागरीकांची गर्दी जमली होती.
मयत धनश्रीचे पती रिक्षाचालक तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. तिच्या पश्चात आई, वडील, दोन लहान बहिणी असा परीवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.