यावल/जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र सरकारने ई-बाईक टॅक्सी आणि केंद्र सरकारने जळगाव शहरात सुरू करत असलेल्या पीएम ई-बस सेवेच्या विरोधात ऑटोरिक्षा चालक मालक संघटना आक्रमक झाली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे १५ लाख ऑटोरिक्षा चालकांचा रोजगार धोक्यात येणार असल्याचा दावा करत, या निर्णयांना मागे घेण्याच्या मागणीसाठी येत्या २१ मे २०२५ रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. कामगार नेते शशांकराव आणि विलास भालेकर या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.
ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीने म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकार बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराच्या नावाखाली ई-बाईक टॅक्सीला परवानगी देत आहे. तर, जळगाव आणि परिसरातील गावांसाठी पीएम ई-बस सेवा सुरू करत आहे. हे दोन्ही निर्णय ऑटोरिक्षा चालकांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहेत. ई-बस सेवा सुरू करताना ऑटोरिक्षा चालकांच्या व्यवसायाचा विचार केला गेला नाही, असा आरोप समितीने केला आहे.

समितीने ऑटोरिक्षा चालकांसाठी असलेल्या महामंडळातील त्रुटींकडेही लक्ष वेधले आहे आणि त्यात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. तसेच, ऑटो रिक्षा चालकांवरील अन्याय त्वरित थांबवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
या मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष शशांक राव आणि महासचिव विलास भालेकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, दिनांक २१ मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या अंतर्गत, ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे आणि जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी यांच्या नेतृत्वाखाली जळगाव आरटीओ कार्यालयासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत धरणे आंदोलन केले जाईल.
यावेळी आंदोलक राज्याचे परिवहन मंत्री आणि परिवहन आयुक्त यांना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन सादर करणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील सर्व ऑटो रिक्षा युनियन संघटना आणि ऑटो रिक्षा चालक मालकांनी या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कृती समितीचे कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी यांनी केले आहे.


