शेंदूर्णी, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग कमी करण्यात यशस्वी ठरलेल्या धारावी पॅटर्न शेंदुर्णी शहरात राबविण्याचा मानस मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी व्यक्त केला. ते नगरपंचायत प्रांगणात नगरपंचायत पदाधिकारी,अधिकारी, व खाजगी डॉक्टर, पत्रकार, समाजसेवक यांची बैठक बोलत होते.
बैठकीत मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी सांगितले की जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शहरात विविध ठिकाणी मोहल्ला क्लिनिक स्थापन करण्यात येत आहे. त्यासाठी नगरपंचायत प्रशासन, प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी सॅनिटायझर, मास्क यांचा नियमितपणे वापर करणे, सोशियल डिस्टन्सचे पालन करणे या बरोबरच प्रभावी उपाय म्हणून शहरात धारावी पॅटर्न राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत २ खाजगी डॉक्टर आशा वर्कर, नगरपंचायत कर्मचारी यांची टीम तयार करून सदर टीम प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करून संशयित व्यक्तींना पुढील तपासणी करीता पाठविण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला व आरोग्य टीमला सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले. बैठकीत आरोग्य अधिकारी डॉ. राहुल निकम, समाजसेवक गोविंद अग्रवाल, डॉ. विजयानंद कुळकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.