धरणगावात मातब्बर मोहरा भाजपच्या मार्गावर : नगरपालिका निवडणुकीसाठी ठरणार ‘गेमचेंजर’ ?

धरणगाव-अविनाश बाविस्कर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज एक्सक्लुझीव्ह रिपोर्ट | एकीकडे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशामुळे नगरपालिकेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असतांना धरणगाव नगरपालिकेच्या रिंगणातील एक मातब्बर मोहरा भाजपच्या मार्गावर असून येत्या काही दिवसांमध्ये त्यांचा प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे.

धरणगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाला आजवर पूर्णपणे कधीही यश लाभले नाही. आज महायुतीचा घटकपक्ष असणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील हे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असून ते पालकमंत्री देखील आहेत. सध्या प्रशासक असले तरी धरणगाव नगरपालिकेवर देखील गुलाबभाऊंचेच वर्चस्व होते. २०१६ साली केंद्र व राज्यात महायुतीचे मित्रपक्ष असतांना देखील शिवसेना व भाजप स्वतंत्र लढले होते. या अटीतटीच्या लढाईत शिवसेनेला यश लाभले होते. यानंतर गेल्या नऊ वर्षात अनेक बदल झाले आहेत. शिवसेनेची दोन शकले उडाली असून शिंदे व ठाकरे गटात त्यांची विभागणी झाली आहे. तर भाजप एकसंघ असून या पक्षाची ताकद वाढत आहे.

काही दिवसांपूर्वीच एरंडोल विधानसभा मतदारसंघातुन अपक्ष लढलेले भगवान महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने राजकीय निरिक्षकांचे कुतुहल चाळवले आहे. ते एरंडोल व पारोळ्यासह जळगाव ग्रामीणमध्येही सक्रीय राहण्याची शक्यता आहे. यानंतर काही दिवसांपूर्वीच गुलाबराव देवकर हे देखील अजितदादा पवार यांच्या गटात दाखल झाले आहेत. यामुळे जळगाव ग्रामीणमध्ये सत्ताधारी महायुतीची ताकद वाढली असून विरोधक कमकुवत होत असल्याचे आजचे चित्र आहे. यातच भाजपने विरोधातील एका मातब्बर नेत्याला गळाशी लावण्याचे काम सुरू केल्याची खात्रीलायक माहिती आहे.

भाजपशी बोलणी सुरू असलेला नेता हा शहराच्या राजकारणातील एक मातब्बर असा मोहरा मानला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पक्षांतराची चर्चा होत असली तरी यासाठी मुहुर्त लाभलेला नाही. आता मात्र सुप्रीम कोर्टाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यामुळे त्यांचा प्रवेश हा येत्या काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यांना पक्षात घेऊन नगरपालिका निवडणुकीत तगडे आव्हान उभे करण्याची भाजपची रणनिती असल्याचे यातुन स्पष्ट झाले आहे. आता भाजपमध्ये येणारा हा नेता नगरपालिका निवडणुकीत ‘गेमचेंजर’ ठरणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या या खेळीमुळे धरणगाव शहराच्या राजकारणातील चित्र फारच इंटरेस्टींग होणार आहे. एकीकडे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची एकहाती घट्ट पकड असतांना दुसरीकडे भाजप देखील आपली ताकद वाढवत आहे. तर, अजितदादा पवार गट हा गुलाबराव देवकरांच्या आगमनामुळे पुन्हा ताकदीनिशी उतरण्याची शक्यता आहे. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्था या स्वतंत्र लढल्या जातील अशीच शक्यता आहे. यामुळे महायुतीच्या माध्यमातून सत्तेत एकत्र असून देखील शिवसेना-शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे. तर यासोबत, कायम संघर्षाच्या पवित्र्यात असणारी शिवसेना-उबाठा, काँग्रेस, शरद पवार गट आदी पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची बाब निश्चीत होय. परिणामी धरणगावात बहुरंगी लढत होण्याचे संकेत आतापासूनच दिसून येत आहेत.

Protected Content