धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी धरणगावातील महाप्रबोधन यात्रेत पालकमंत्र्यांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेवर अतिशय खालच्या स्तरावर टिका केल्याच्या कारणावरून त्यांच्या विरोधात येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. परवा धरणगाव, काल पाचोरा आणि एरंडोल येथे यानिमित्त सभा झाल्या. यात सुषमा अंधारे यांच्यासोबत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अतिशय आक्रमक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाच्या आमदारांवर अतिशय शेलक्या भाषेत टीका केली. याची दखल घेऊन जिल्हाधिकार्यांनी शरद कोळी यांना भाषण करण्यास बंदी घातली आहे. यानंतर त्यांच्या विरोधात धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद कोळी यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह शिंदे सरकार आणि त्यांच्या मंत्री आणि सहकार्यांवर अतिशय खालच्या स्तरावरून टीका केली होती. याच प्रकरणी त्यांच्या विरोधात धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी बाळू जाधव यांनी धरणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार भादंवि कलम-२९५ आणि १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्षणीय बाब म्हणजे हा गुन्हा शरद कोळी यांच्यासह आयोजकांवर देखील दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलीस तपासात अजून संशयितांच्या नावात वाढ होण्याची शक्यता आहे.