धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत धरणगाव शहरात आणखी २५ घरकुलांना मंजुरी मिळाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र शासन पुरस्कृत या योजनेची अंमलबजावणी २०१८ पासून सुरु असून याआधीच्या टप्प्यातील सर्व १३५ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेतून अनेक कुटुंबांचे पक्के घराचे स्वप्न पूर्ण झाले असून आता नवीन टप्प्यातून अधिक लाभार्थ्यांना निवारा मिळणार आहे.
२०१८ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत पहिल्या टप्प्यात मंजूर १३५ घरकुलांपैकी ११५ लाभार्थ्यांना संपूर्ण २.५० लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित २० लाभार्थ्यांनाही २.२० लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळाले असून, अंतिम ३० हजार रुपयांचा हप्ता मंजूर होऊन लवकरच वितरित केला जाणार आहे. या यशस्वी अंमलबजावणीबद्दल धरणगाव नगरपरिषदेला जिल्हाधिकारी जळगाव यांच्या हस्ते गौरविण्यात आले असून, ‘शासनाचे १०० दिवस कार्यक्रम’ अंतर्गत नाशिक विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

या यशाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत दुसऱ्या टप्प्यासाठी व्यापक प्रचार मोहीम राबवण्यात आली होती. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर पात्र अर्जांची छाननी करून केंद्रस्तरीय मान्यता व संनियंत्रण समितीने (CSMC) २५ नवीन घरकुलांसाठी मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर २४ फेब्रुवारी २०२५ रोजी नगरपरिषद कार्यालयात एक विशेष मेळावा आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व बांधकाम परवानगी प्रक्रिया मार्गदर्शक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली.
रचना सहाय्यक भूपेंद्र पवार, नगर अभियंता निलेश तमखाने आणि शहर तांत्रिक कक्ष अधिकारी विक्रांत चौधरी यांनी घरकुल बांधणीच्या विविध टप्प्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अनुदान वितरण कसे होईल याची माहिती देतानाच लाभार्थ्यांना बांधकामाचे नियोजन कसे करावे, याबद्दलही दिशा दिली. योजनेच्या पुढील अंमलबजावणीत घरकुल बांधण्यासाठी महसूल प्रशासनामार्फत लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत दिली जाणार असून, सौर उर्जेस प्रोत्साहन देण्यासाठी घरावर सोलर पॅनल बसविल्यास शासनाकडून ५००० रुपयांची अतिरिक्त सबसिडीही देण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे आणि पक्क्या घराचे स्वप्न साकार करावे, यासाठी धरणगाव नगरपरिषदेत प्रधानमंत्री आवास योजना कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन कार्यालय अधीक्षक भिकन पवार यांनी केले आहे.



