धरणगाव प्रतिनिधी | जमावबंदी असतांनाही कायद्याचा भंग करून विद्यापीठाच्या परिसरात आंदोलन केल्याबद्दल अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या संदर्भात वृत्त असे की, कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता जिल्हाधिकार्यांनी जळगाव जिल्ह्यात २२ डिसेंबरपासून जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. असे असतांनाही अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी २८ डिसेंबर रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आवारात आंदोलन केले. राज्य विधानसभेने पारीत केलेल्या विद्यापीठ विधेयकाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी या कायद्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील करण्यात आले.
दरम्यान, जमावबंदी असतांनाही आंदोलन केल्यामुळे नितेश कैलास चौधरी (रा. एरंडोल): ज्ञानेश्वर जनार्दन उद्देवाल (रा .नवीपेठ, जळगाव); इच्छेस रवींद्र काबरा (रा. भाटीया गल्ली, धरणगाव); मयूर मधुकर माळी (रा. शेंदुर्णी, ता. जामनेर); रितेश महेंद्र महाजन ( रा. रामानंद नगर, जळगाव); चैतन्य सचिन बोरसे (रा. शाहू नगर, जळगाव) आणि चिराग रामभाऊ तायडे (रा. जळगाव) या सात जणांच्या विरूध्द सहायक फौजदान नसीम इस्माईल तडवी यांनी फिर्याद दिली.
या पिर्यादीनुसार म. पो. अधिनियम कलम ३७(१); ३७(३) आणि कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भातील पुढील तपास विजय सिताराम चौधरी हे करीत आहेत.