मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झाला होता. शिवसेनेचे दिवंगत नेते व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आला. शुक्रवारी २८ सप्टेंबर रोजी चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला.
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिश दातेने साकारली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, याची आकडेवारी समोर आली आहे. चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. मंगेश देसाई यांनी चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये पहिल्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी देण्यात आली आहे. चित्रपटाने दमदार ओपनिंग केली आहे. पहिल्या दिवशी ‘धर्मवीर २’ ने पहिल्या दिवशी १.९२ कोटी रुपये कमावले. २०२४ मध्ये सर्वाधिक ओपनिंग करणारा हा मराठी चित्रपट आहे.