अमळनेर (प्रतिनिधी)– लोकसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण देणार असल्याची माहिती पशुसंवर्धन दुग्धविकासचे कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी अमळनेर येथील एका खासगी कार्यक्रमात दिली.
अमळनेर येथील आल्हाद नगर भागात बन्सीलाल भागवत यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी मेळाव्यात जानकर बोलत होते यावेळी सर्व समाजातील नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक हिरामण कंखरे हे उपस्थित होते तर व्यासपीठावर राजाभाऊ कोतारे, उल्हास आडणारे, रवी पवार, तुषार वाघुळदे, राजू चौधरी, पंकज धनगर, शितल चिंचोरे, संदीप घोरपडे, मगन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी साई गजानन परिवारातर्फे जानकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सदस्य पदी निवड झाल्यामुळे कवी रमेश पवार व दुग्ध तंत्रनिकेतन या विषयावर पुस्तक लिहिणारे लेखक धीरज कंखरे तर बन्सीलाल भागवत यांचा सपत्नीक गौरव जानकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बन्सीलाल भागवत राजाभाऊ कोतारे हिरामण कंखरे आदींनी मनोगत व्यक्त केले.
करणखेडा येथील विकास कामांचे उदघाटन करून जानकर हे अंमळनेर शहरात सायंकाळी चार वाजता परतले यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर न बसता यांनी प्रेक्षकात बसणे पसंत केले. यानंतर या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना जानकर म्हणाले की मी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे विविध ठिकाणी निवडणुका लढविल्या सर्व ठिकाणी पराभूत झालो मी मात्र जळत गेलो प्रकाश मात्र पक्षाला मिळत गेला आता दोन आमदार या पक्षाचे असून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका यावर देखील पक्षाचे वर्चस्व राज्यात निर्माण झाले आहे. ठाकूर समाजासह अनुसूचित जातींमध्ये २२ जातींचा अभ्यास केला जात असून धनगर समाजाला लोकसभा निवडणुकीपूर्वीच आरक्षण मिळेल असा आपल्याला विश्वास असल्याचे मत जानकर यांनी यावेळी व्यक्त केले. अमळनेर शहर बुद्धिजीवींचे शहर असून या शहरासाठी सर्वसामान्य कुटुंबातील तरुण स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन मिळेल यासाठी मी दहा लाख रुपयांचा निधी अभ्यासिकेस देणार असल्याची घोषणा जानकर यांनी यावेळी कार्यक्रमात केले त्यामुळे उपस्थितांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी बन्सीलाल भागवत यांनी प्रास्ताविक केले सुत्रसंचालन प्रा.अशोक पवार तर डी.ए.धनगर यांनी आभार मानले.