मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसातच बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झाले आहे. खंडणी प्रकरणातून मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मीक कराड व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा खून केल्याचे समोर येताच त्यांच्या विरोधात समाजमन आक्रमक झाले. यातच वाल्मीक कराडची वेगवेगळी प्रकरणे समोर आल्याने पुन्हा खळबळ उडाली. पोलिसांना अनेक दिवस चकमा दिल्यानंतर अखेर वाल्मीक कराडला बेड्या ठोकण्यात आल्या. तर त्याला खुनात आरोपी देखील करण्यात आले.
दरम्यान, कालच संतोष देशमुख यांच्या हत्येची भयंकर छायाचित्रे समोर आल्याने लोकांना मोठा धक्का बसला. या प्रकरणातील क्रौर्य हे यातून समोर आले तेव्हाच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल हे स्पष्ट झाले. विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा निर्णय होईल असे मानले जात होते. तथापि, दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हा निर्णय झाला.
मंगळवारी सकाळपासूनच धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या शासकीय बंगल्यात हालचाली सुरू झाल्या. यासोबत त्यांच्या बंगल्याच्या बाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आज धनंजय मुंडे यांचे पीए राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले व त्यांनी राजीनामा फडणविसांना सुपुर्द केला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलतांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती दिली. आपण मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून तो राज्यपालांकडे पाठविल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. यामुळे फडणवीस सरकार अस्तित्वात येऊन चार महिने होत नाही तोच एका मंत्र्याच्या राजीनाम्याची नामुष्की ओढवली आहे.