जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वावडदा ते वडली दरम्यान झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या महाविद्यालयीन तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी ३ मार्च सकाळी ११ वाजता खाजगी रुग्णालयात त्याने शेवटचा श्वास घेतला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मृत तरुणाचे नाव निशांत विजय पाटील (राजपूत, वय १९, रा. गोराडखेडा, ता. पाचोरा) असे आहे. तो जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. निशांतचे वडील विजय पाटील हे गोराडखेडा गावचे उपसरपंच आहेत.
अपघाताची घटना
शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) सायंकाळी ७ वाजता निशांत महाविद्यालयातून दुचाकीने घरी निघाला होता. रात्री ८ वाजता तो वावडदा-वडलीदरम्यान पोहोचला असता त्याच्या दुचाकीचा अपघात झाला. अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. चार दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
कुटुंबीयांचा आक्रोश
निशांतच्या मृत्यूने कुटुंबीयांवर शोककळा पसरली. पुढील कार्यवाहीसाठी त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला. त्यावेळी कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.