औरंगाबाद प्रतिनिधी । महापूरग्रस्तांना मदत करतांना कथित सेल्फी प्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करतांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पातळी सोडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पैठण येथून शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला. यात भोकरदन येथील सभेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. याप्रसंगी त्यांनी पातळी सोडून टीका करत जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन व ना. सदाभाऊ खोत यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, ”गिरीश महाजन आणि सदाभाऊ खोत ही मढ्यावरचं लोणी खाणारी लोकं आहेत. ते पिस्तुलराव महाजन, तुम्ही पाहिलं असेल? पूराच्या गावात सेल्फी काढतायेत, मग जोड्यानं नाही हाणलं पाहिजे का त्याला? एक सेल्फी काढतोय? तर, दुसरा सदा खोत, त्यानं तर बोटेत माणूस घेतला टीव्ही चॅनेलवाला. उगाच इकडून तिकडं बोट घेऊन जातोय” अशा शब्दांमध्ये धनंजय मुंडे यांनी टीका केली. दरम्यान, मुंडे यांनी खालील पातळीवर उतरून टीका केल्याने याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.