मुंबई प्रतिनिधी । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या प्रकरणाचे मुख्यमंत्र्यांना गांभिर्य नसून त्यांनी पोलिसांकडून नीट माहिती घेण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात कथिररित्या मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सकाळी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे.
फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्य ऐकून त्यांनी या प्रकरणाची माहिती नीट घेतली नसल्याचं वाटतं. उद्धव ठाकरेंना गांभीर्य लक्षात आलेलं नाही, त्यांनी याप्रकरणाला गांभीर्यानं घेतलेले दिसत नाही. त्यांनी या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी, क्लीप्स नीट ऐकाव्या यावरून कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते कळेल.
फडणवीस यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलीस दबावात आहेत का?असा प्रश्न निर्माण होतोय, असं म्हटलं. त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचा आहे, हे स्पष्ट आहे. पोलिसांनी ते सांगितलं पाहिजे. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंना या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी या संबंधातील नीट माहिती घ्यावी म्हणजे कुणाचं आयुष्य उद्धवस्त झालंय ते त्यांना कळेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Pooja Chavan Suicide case )