पंढरपूर-वृत्तसेवा | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कार्तिकी एकदशीला सपत्नीक शासकीय पूजा केली. याप्रसंगी त्यांनी श्री विठ्ठलास साकडे घालत सर्वांना सुखी-समाधानी ठेव अशी प्रार्थना केली.
यंदा २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कालच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली होती. आधी मराठा समाजाने यासाठी विरोध दर्शविला होता. तथापि, प्रशासनाच्या सोबत झालेल्या चर्चेतून मार्ग निघाल्याने देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक पूजा करतील ही बाब स्पष्ट झाली होती.
या अनुषंगाने आज पहाटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह विधीवत पूजन करून श्री विठ्ठल चरणी प्रार्थना केली. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा, शेतकर्यावरील संकट दूर व्हावे, पावसामुळे चिंताग्रस्त शेतकर्यांना धीर व समाधान देण्याची शक्ती विठुरायाने आम्हाला द्यावी, अशी प्रार्थना फडणवीसांनी विठुरायाकडे केली. पसायदानामध्ये ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी मागणं मागितलं. तसंच मागणं मी विठुरायाचरणी करतो, सर्वांना सुखी ठेवण्याची, समाधानी ठेवण्याची शक्ती माऊलीने आम्हाला द्यावी, असेही फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, त्यांनी विठ्ठल मंदिर समिती आणि सर्वच जिल्हा प्रशासनाचे आभारही मानले. तसेच याप्रसंगी बबन दादा घुगे आणि वत्सला घुगे या दाम्पत्यास मानाचे वारकरी होण्याचा बहुमान मिळाला.
आज पूजा करण्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील प्रमुख मानाचे फडकरी, संतांचे वंशज तथा वारकरी संघटनांचे प्रमुख यांची भेट घेत त्यांनी संवाद साधला. महंतांच्यावतीने फडणवीस यांचा सत्कारही करण्यात आला. तर कार्तिकी एकादशीनिमित्त देशभरातून लक्षावधी भाविक पंढरपूरात दाखल झाले असून त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे.