मुंबई (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं हा माझ्यासाठी एक धक्का होता. मला या सरकार स्थापनेने फार आनंद झाला नाही,असे वक्तव्य राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.
एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सरकार बनवण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की, राज्य राष्ट्रपती राजवटीतून बाहेर पडले त्याचा मला आनंद झाला होता. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी अभिनंदन केलं. पण मला या सरकार स्थापनेने फार आनंद झाला नाही. पक्षाच्या कोअर कमिटीची सदस्य असली तरी मला त्या निर्णयाबद्दल काही माहित नव्हते. जेव्हा मी शपथविधी पाहिला तेव्हा तो माझ्यासाठी सुद्धा धक्का होता असे पंकजा मुंडे म्हणाल्या.