पूर परिस्थिती आणि मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्न धान्य, पिण्याचे पाणी आदि सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर परिस्थिती यंत्रणांमार्फत सुरू असलेले मदतकार्य याबाबत मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेतला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख, पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील जिल्हाधिकार्‍यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत पूर परिस्थिती आणि मदत कार्याची माहिती घेतली.

कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) २२ पथके कार्यरत आहेत. मुख्य सचिवांनी केंद्रीय सुरक्षा सचिवांशी संपर्क साधून डोनिअर विमानाच्या माध्यमातून पुरग्रस्तभागातील नागरिकांना स्थलांतर करण्याची मागणी केली. त्यानुसार आता कार्यवाही सुरू असल्याचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. कोल्हापूर मधील २०४ गावांना पूराचा फटका बसला आहे. प्रशासनामार्फत सध्या ११ हजार नागरिकांना सुरक्षीत ठिकाणी हलविण्यात आले आहे. आता नौदलाचे बचाव पथक देखील कार्यरत आहे.

ज्या भागात पुरामुळे लोक अडकले आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे आले त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. धरण क्षेत्रात पडणारा पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग याबाबत माहिती मिळाल्यास त्या भागातील रेल्वेसेवासाठी उपयुक्त ठरेल अशी सूचना रेल्वेच्या अधिकार्‍यांनी मांडली होती त्यावर रेल्वेला ही माहिती देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिली.

या बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदींसह रेल्वे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Protected Content