अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज शरद पवार गटात येणार

सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शरद पवार हे त्यांच्या पक्षासाठी ताकदीने कामाला लागले आहेत. त्याची प्रचिती देखील पाहायला मिळत आहे. त्यांनी माढा लोकसभेत भाजपला धक्का दिला. धैर्यशिल मोहिते पाटील यांना पक्षात प्रवेश देत त्यांना माढा लोकसभेची उमेदवारी देखील जाहीर केली. त्यानंतर शरद पवार यांनी भाजपला अजून एक धक्का दिला आहे. पवारांनी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अहिल्यादेवी होळकरांचे वंशज असलेले भूषणसिंह होळकर हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत भूषणसिंह होळकर हे शरद पवार गटाचे स्टार प्रचारक असतील. तसेच भूषणसिंह होळकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तीन वर्षांपूर्वी याच भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागले होते. मध्यंतरी जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद चांगलाच गाजला होता. त्यावेळी शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पणाला विरोध करण्यात आला होता. तेव्हा भूषणसिंह यांनी, होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा असल्याचा आरोप केला होता. मात्र, आता तेच भूषणसिंह होळकर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी आणखी एका विरोधकाला स्वत:च्या बाजूने वळवण्यात यश मिळवले आहे. यापूर्वी शरद पवार यांनी चंद्रराव तावरे, अनंत थोपटे आणि बारामतीमधील पवार कुटुंबीयाचे पारंपरिक विरोधक असलेल्या काकडे कुटुंबीयांची भेट घेऊन राजकीय शत्रुत्त्वाला तिलांजली दिली होती.

Protected Content