Home Uncategorized चिंचोली येथील मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी !

चिंचोली येथील मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चिंचोली येथे साकारले जात असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. ही इमारत अत्यंत अत्याधुनिक आणि सुसज्ज असून, ती केवळ जळगावसाठीच नव्हे, तर संपूर्ण खान्देशच्या विकासाच्या टप्प्यात अभिमानाची बाब ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पासाठी मेहनत घेणारे प्रकल्प विकासक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

रविवार, १७ ऑगस्ट रोजी जळगाव दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या निर्माणाधीन इमारतींची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खासदार स्मिता वाघ, माजी मंत्री आमदार अनिल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी उपस्थित होते. तसेच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, उपअधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. धर्मेंद्र पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे व संजय चौधरी हे देखील उपस्थित होते.

सुरुवातीला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. ठाकूर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रतिकृतीद्वारे संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. प्रकल्पाचे कौतुक करताना अजित पवार यांनी प्रकल्प लवकर पूर्ण होऊन वैद्यकीय महाविद्यालय पुढील काळात स्थलांतरित होईल अशी आशा व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयातील विविध विभागांच्या रचना प्रत्यक्ष पाहणी करून समजून घेतल्या. एका चित्रफितीद्वारे संपूर्ण मेडिकल हबची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिली. अतिशय सुंदर असे महाविद्यालय, रुग्णालय व त्याचा परिसर बनत असल्याचे पाहून त्यांनी प्रकल्प विकासक यांचे कौतुक केले.

या निर्माणाधीन मेडिकल हबच्या काही ठिकाणी ‘फिनिशिंग’चे काम बाकी असून, ते दर्जेदार व चांगल्या पद्धतीने करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्प विकासक कंपनी एचएससीसी व न्याती कन्स्ट्रक्शन यांना दिल्या. जिल्ह्याच्या आरोग्य विकासासाठी पाहिलेले मेडिकल हबचे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना पाहून मनस्वी आनंद होत असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अजित पवार यांनी केलेले कौतुक पाहून विकासकामांबाबत समाधान लाभत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच मेडिकल हबचा प्रकल्प तयार करत असलेले एचएससीसी कंपनीचे महाप्रबंधक बी. एस. कांबळे, उपमहाप्रबंधक एस. के. जैन, न्याती कन्स्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर जगदीश ओटी, अधीक्षक अभियंता शिवाजी पिंगळे, गणेश घोले, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक अख्तर दफेदार आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound