फैजपूर (प्रतिनिधी) झेंडूजी महाराज बेळीकर व जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी दिगंबर महाराज चिनावलकर वै. अरुण महाराज बोरखेडेकर यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान खानापूर येथून झाले आहे.
यावेळी दिगंबर मठ संस्थानचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. दिंडी सोहळा हभप दुर्गादास महाराज नेहते यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार असून विणेकरी सेवा हभप भगवान महाराज चौधरी खानापूर हे करणार आहेत. दिंडी सोहळ्याचे सुमारे ३६ वे वर्ष असून अखंडपणे सुरू आहे. या सोहळ्याला वै. दिगंबर महाराज चिनावलकर व अरुण महाराज बोरखेडेकर यांनी यापूर्वी संपूर्ण आयुष्य खर्ची घालून दिंडी परंपरेची कायम जोपासना केली आहे. ही दिंडी चिनावल, हंबर्डी, भुसावळ, खडके, जामनेर, सिलोड, जालना, बीड, बार्शीमार्गे पंढरपूरला पोहचून तेथे दिगंबर महाराज मठात तिचा मुक्काम राहील.
याकाळात जाताना दररोज कीर्तन, भजन या माध्यमातून व्यसनमुक्ती कार्यक्रम, स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. दिंडीमध्ये खानापूर, पाडले, चिनावल, रोझोदा, खिरोदा, कळमोदा, बोरखेडा, फैजपूर, हंबर्डी, आमोदा येथील भाविक सहभागी झाले आहेत. दिंडीकरीता अध्यक्ष नरेन्द्र नारखेडे, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, विठ्ठल भंगाळे, किशोर बोरोले, विजय महाजन, टेनु फेगडे, पांडुरंग पाटील, मुकेश पाटील, भास्कर बोडे, खानापूर, चिनावल, बोरखेडा ग्रामस्थ व ट्रस्ट मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे.