यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरल्याने नगरपालिका प्रशासनाने तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोठया प्रमाणावर डास व मच्छर यांचा उपद्रव वाढला असुन शहरातील विविध भागात डेंग्यू व मलेरीया रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये रुग्ण उपचार घेत असुन नागरिकांमध्ये आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असुन म्हणून पालिका प्रशासन व तालुका आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करावी म्हणून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी नगर परिषद प्रशासनाला पत्र देऊन मागणी केली आहे.
याबाबत यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या काही दिवसांपासून डास व मच्छर यांचा उपद्रव वाढल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात डेंग्यू व मलेरिया आजारा चे रुग्ण उपचार घेत असल्याचे चित्र आहे. शहराच्या विविध भागांत मोकळ्या जागेवर पाण्याचे व गटारीचे डबके साचलेले असुन त्या वरील दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे एडीस इजिप्ती नावाचे डेंग्यू आजाराच्या अळ्या तयार होत आहे.
या अळ्यांमुळे डासांची उत्पत्ती होत असुन शहरातील नागरीक डेंग्यू व मलेरिया या आजारांमुळे बाधीत होत आहे. म्हणून यावल नगरपरिषदने तालुका आरोग्य विभाग यांची मदत घेऊन घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करावे व ज्या भागांत मोकळ्या जागेत डबके साचलेले असतील ते ठिकाण माती टाकून बुजुन नष्ट करावे अशी मागणी केली जात आहे.
यावल शहरातील प्रत्येक भागात नगर परिषद प्रशासनाने नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेत कान्या कोपर्यात धुरळा फवारणी करावी. यासोबत, गटारी वर बीएससी पावडर मारावी.नगरपरिषद ने पथक तयार करून तालुका आरोग्य विभाग यांच्या मदतीने घरोघरी जावुन रुग्णांची आरोग्य तपासणी करून सर्व्हेक्षण करावे व रूग्णांवर शासकीय इस्पितळात उपचार करून मोफत औषधी उपचार करावेत अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी या निवेदनात केली आहे.