भुसावळ प्रतिनिधी । धान्याच्या काळ्या बाजाराकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या रावेर तालुका पुरवठा अधिकारी हर्षल पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन उपविभागीय अधिका-यांना आज दि. १९ ऑगस्ट रोजी देण्यात आले, असून रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) यांचे वतीने लोकशाही मार्गाने जनहितार्थ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, १४ ऑगस्ट रोजी रावेर तालुक्यात जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी खाजगी धान्य गोदामावर छापा टाकून २८ लक्ष रुपयांचे धान्य जे परराज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवले होते. ते जप्त करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिका-यांना माहिती मिळताच, त्यांनी वेळेवर छापा टाकून धान्य काळ्या बाजारात विक्री करण्यांच्या मुसक्या आवळल्या. परंतु रावेर परिसरात इतक्या बेकायदेशीर रित्या धान्य साठा होत आहे, याची माहिती रावेर तालुका पुरवठा अधिकारी हर्षल पाटील यांना असतांना सुद्धा त्यांनी कार्यवाही का केली नाही? आज रोजी धान्याच्या सर्व प्रक्रिया ऑनलाईन असतांना धान्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात साठा रावेर मध्ये कसा? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले असून रावेर तालुक्यातील झालेल्या धान्याच्या भष्टाचाराची सखोल चौकशी करून तालुका पुरवठा अधिकारी हर्षल पाटील यांचेवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा गोरगरिबांच्या तोंडातला घास काळ्या बाजारात विकणा-या दलालांना पाठीशी घालणाऱ्या हर्षल पाटील यांच्या निषेधार्थ आज पासून रिपब्लिकन पक्ष(आठवले गट) यांचे वतीने लोकशाही मार्गाने जनहितार्थ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.