चाळीसगाव, प्रतिनिधी | राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात अश्लील चाळे करून तसे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करून राजगडाचे पर्यायाने गड-किल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्या तरुण-तरुणीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गड किल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेतर्फे येथील पोलीस निरीक्षकांना दिलेल्या एका निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध गडकिल्ल्यांचे पावित्र्य अबाधित राहावे आणि पुढच्या पिढीला आपल्या पराक्रमी पूर्वजांचा प्रेरणादायी इतिहास माहित व्हावा, गडकिल्ल्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी आमची संस्था काम करीत असते. राजगड किल्ल्यावर श्रेयस लावड नावाच्या व्यक्तीने एका तरुणीसह अश्लील चाळे करून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने किल्ल्याचे पावित्र्य भंग पावले आहे. तरी या व्यक्तीवर कारवाई करून त्याला कठोर शासन करावे, अशी मागणी संस्थेने केली आहे.