जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संत साहित्य अध्यासन पीठ स्थापीत करण्यात यावे अशी मागणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली होती. आज याला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या माध्यमातून पालकमंत्री. ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या एका महत्वाच्या आश्वासनाची पूर्तता केली आहे.
कवयीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक शुक्रवारी विद्यापीठात पार पडली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ना. उदय सामंत यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात संत साहित्य अध्यास पीठ स्थापीत करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा केली.
लवकरच मंत्रीमंडळाची मिळणार मान्यता
कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात संत साहित्य अध्यासन केंद्र स्थापीत करण्यात यावे या मागणीसाठी ना. गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खान्देशच्या भूमीत अनेक संतांनी आपला अवतार धारण केलेला आहे संतांचे अभंग, ओव्या, श्लोक, दोहे व भारुड यासह विविध प्रकारचे वांग्मय समाजाला आजही नवीन दिशा देणारे आहेत. त्यामुळे खानदेशात मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण येथील संत मुक्ताई , संत चांगदेव महाराज यासह जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील भूमी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत संतांच्या विचारांचा अभ्यास खानदेशातील विद्यार्थ्यांना करता यावा यासाठी मुंबई व पुणे प्रमाणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा त देखील संत साहित्य अध्यासन केंद्र सुरु करण्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार २८ जुलै २०१७ रोजी विद्यापीठामार्फ शासनास अभ्यासपूर्वक प्रस्ताव सादर केला होता. मात्र तत्कालीन शासनाने फक्त कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने अध्यासन केंद्र मंजूर केले होते. संत मुक्ताई व इतर संतांच्या नावाने संत साहित्य अध्यासन केंद्र मंजुरीचा प्रस्ताव प्रलंबित होता.
आज याबाबत ना. गुलाबराव पाटील यांनी ना. उदय सामंत यांच्याशी याबाबत चर्चा केली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीनुसार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सावंत यांनी तात्काळ दखल घेऊन येणार्या कॅबिनेटच्या बैठकीत या विषयाला मंजुरी देऊन अनुदान दिले जाईल असेही सांगितले. यामुळे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या एका आश्वासनाची पूर्तता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या बैठकीस राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, कुलगुरु प्रा.डॉ. पी.पी.पाटील, प्र कुलगुरु पी. पी. माहुलीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता, डॉ.ए.बी.चौधरी, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रा.सतीश देशपांडे, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.पी.डी.नाथे, परिक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील, सिनेट सदस्य विष्णू भंगाळे आदी उपस्थित होते.