मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एका महिलेने पाच कोटी रूपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना एका महिलेने पाच कोटी रूपयांची खंडणी मागितली असून हे पैसे न दिल्यास बलात्काराची तक्रार करण्याची धमकी दिल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी या महिलेविरोधात आपल्या तक्रारीत केला आहे. मुंबईच्या मलबार हिल पोलीस स्थानकात याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण सध्या क्राईम ब्रांचला वर्ग करून तपासाला देण्यात आलंय. सध्या क्राईम ब्रांच पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, खंडणी मागणारी महिला ही आपल्या परिचयातील असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीनुसार संबंधीत महिलेने फेब्रुवारी ते मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन केला होता. या प्रसंगी झालेल्या वार्तालपात त्या महिलेने पाच कोटी रूपये आणि महागड्या मोबाईलची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी त्यांना देण्यात आली होती. मुंडे यांनी या धमकीनंतर ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून ३ लाख रुपये आणि महागडा मोबाईलही कुरियरद्वारे पाठवला होता. मात्र तरीही महिला आणखी ५ कोटींच्या ऐवजाची मागणी करत होती. त्यामुळे धनंजय मुंडेंनी अखेर पोलीसात धाव घेतली असून त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.