जामनेर प्रतिनिधी | तालुक्यातील तळेगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील एससी-एसटी प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, अशा मागणीचे निवेदन पालकांतर्फे गटशिक्षणाधिकारी यांना नुकतेच देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्याच्या गणवेशासाठी 600 रुपये निधी प्राप्त झाला असून 15 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचे असतात. परंतू संपूर्ण महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागत आहे.
यामध्ये मुख्याध्यापक मनोज राजपूत यांनी घोळ केल्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आकाश जाधव, नंदू लोखंडे, शैला कोळी, पालक सुनील कोळी, विनोद पडोळसे, गोपाल माळी आणि रघुनाथ सपकाळे यांनी दि. १६ सप्टेंबर रोजी गटशिक्षाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली असून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय मिळवून गणवेश देण्यात यावा, अशा मागणी शाळा व्यवस्थापन समिती सह पालक वर्गातून होत आहे. याचबरोबर, मुख्याध्यापक मनोज सिंग राजपूत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुलांसाठी गणवेश देण्यात आले आहेत. तर काही विद्यार्थ्यांचे गणवेश शिवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले असून म्हणाले, लवकरच विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहे.