Home Cities अमळनेर अमळनेरमध्ये वाळू वाहतुकीवर तीन दिवस बंदीची मागणी

अमळनेरमध्ये वाळू वाहतुकीवर तीन दिवस बंदीची मागणी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चैत्र नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदुरी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेने वाळूच्या अवजड वाहतुकीवर तीन दिवस बंदी घालण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

चैत्र नवरात्रोत्सव सुरू झाल्यामुळे सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक पदयात्रा करत नांदुरी गडावर जात असतात. अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव आदी तालुक्यांमधून मोठ्या संख्येने भाविक अमळनेर-धुळे मार्गे दिवसरात्र पायी प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर अवजड वाळू वाहतूक सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पत्रकार संघटनेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दि. २६ ते २८ मार्च या कालावधीत वाळू वाहतुकीच्या अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालावी. यामुळे महिला, लहान मुले तसेच आबालवृद्ध भाविकांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल. विशेषतः रात्रीच्या वेळी अवजड वाहनांमुळे होणाऱ्या धोक्याचा विचार करून ही मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात अमळनेर उपविभागाचे प्रांताधिकारी भंगाळे, डीवायएसपी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा तसेच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकुंभ यांनी संबंधित वाळू वाहतूकदारांना तात्काळ आदेश देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, या मागणीला इतर सामाजिक संघटनांचाही पाठिंबा मिळत असून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवरात्रोत्सवात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने योग्य नियोजनाची गरज अधोरेखित होत आहे.


Protected Content

Play sound