मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुक्ताईनगर आगारातून ये-जा करणाऱ्या सर्व एसटी बस फेऱ्या इच्छापुर बस स्टॅण्डवर थांबविण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी इच्छापुर देवी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात एसटी महामंडळाच्या मुक्ताईनगर आगार प्रमुखांना तसेच मुक्ताईनगर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले असून प्रवासी व भाविकांच्या अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मुक्ताईनगर आगार अंतर्गत असलेल्या सर्व बस फेऱ्या मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील इच्छापुर बस स्टॅण्डवर नियमितपणे थांबत होत्या. मात्र सध्या मुक्ताईनगर-इंदौर हा रस्ता निर्माणाधीन असून नव्याने झालेल्या इच्छापुर बायपासमुळे महामंडळाच्या बसेस इच्छापुर गावात प्रवेश करत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परिणामी, या बसेस थेट बायपासवरच प्रवाशांना उतरवत असल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

विशेषतः यात्रेकरू आणि सामान्य प्रवाशांना इच्छापुर गावात पोहोचण्यासाठी लांबचा पल्ला पायी किंवा इतर साधनांनी पार करावा लागत असून त्यामुळे त्यांना शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. इच्छापुर गावात असलेल्या श्री इच्छादेवीचे अति प्राचीन मंदिर महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी इच्छापुर येथे येतात, मात्र बस फेऱ्या गावात येत नसल्यामुळे भाविकांना सुमारे दोन किलोमीटर अंतरावर उतरविले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या परिस्थितीमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच दूरवरून येणाऱ्या भाविकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुक्ताईनगर आगारातून सुटणाऱ्या सर्व एसटी बस फेऱ्यांना पुन्हा इच्छापुर बस स्टॅण्डवर थांबा देण्यात यावा, जेणेकरून प्रवाशांचा आणि इच्छादेवीवर श्रद्धा असलेल्या भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल, अशी ठाम मागणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.
या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी इच्छापुर देवी ट्रस्टने मुक्ताईनगर येथील पत्रकारांनाही स्वतंत्रपणे निवेदन देऊन ही समस्या व्यापक स्तरावर मांडली आहे. आता एसटी महामंडळ आणि लोकप्रतिनिधी या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे भाविकांसह सर्व प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.



