चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील बोढरे हे गाव हागणदारीमुक्त नसतांना जिल्हा परिषदेतर्फे हागणदारीमुक्त गाव असा फलक का लावण्यात आला आहे असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. हा फलक काढण्यात यावा अशी मागणी गट विकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
बोढरे गावात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे प्रमाणात वाढ झाल्याने येथे दुर्गंधी येत असल्याने जिल्हा परिषदतर्फे उभारण्यात आलेले हागणदारीमुक्त गाव हा फलक काढून टाकावा अशी मागणी गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्याकडे जीवन चव्हाण यांनी केली आहे. मागील दिड वर्षापासून बोढरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस. एस. पाटोळे यांनी शौचालयाची वाढीव यादी स्वतःकडे ठेवल्याने स्वच्छ भारत मिशन या योजनेपासून गावातील लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत असल्याचा आरोप केला आहे. गावातील २७४ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला असून ५८५ लाभधारक या योजनेपासून वंचित आहे. एवढेच नाहीतर ग्रामपंचायतीच्या परिसरात उघड्यावर शौच केले जात आहे अशी भयावह स्थिती असतांना कोणत्या निकषांवर जिल्हा परिषदेने बोढरे गावास हागणदारीमुक्त झाले असल्याचा फलक लावण्यात आला आहे असा प्रश्न जीवन चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.