पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथील अग्नावती नदीपात्र परिसरात अनेक दुकानदारांनी ओव्हरपास उभारले आहेत. अशा दुकानदारांचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निश्चित खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, नदीप्रवाहात असलेल्या या पक्क्या ओट्यांमुळे नदीच्या प्रवाहाची दिशा बदलत असून पुरजन्य परिस्थितीत आमचे पक्की खरेदी असलेल्या दुकानदारांच्या दुकानात पुराचे पाणी घुसते यामुळे लाखोंचे नुकसान होते तसेच या भागात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून या भागातून चालणेही कठीण होत असते.
या सर्व बाबींचा विचार करून अतिक्रमित पक्के ओटे शासनाने या दुकानदारांना बांधू देऊ नये तसेच सुरू असलेले बांधकाम त्वरित थांबवावे, जेणेकरून चाळीसगाव येथे पूरस्थिती मुळे जी समस्या निर्माण झाली. ती स्थिती नगरदेवळ्यात निर्माण होऊ नये अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली आहे. या निवेदनावर उमेश लढ्ढा, विनोद लढ्ढा, सुदर्शन ऍग्रो एजन्सी, निंबा वाणी, बालू वाणी, नंदू शिंपी, मुकुंद बोरसे ,भालचंद्र शिरुडे, विनोद परदेशी, दिगविजय काटकर, डॉ. दर्शन पवार आणि इतर व्यापारी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.