
अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आ.अनिल पाटील आणि माजी जि.प.सदस्या जयश्रीताई पाटील यांचा मजबूत बालेकिल्ला असलेल्या कळमसरे-प्र.डांगरी जिल्हा परिषद गटातून युवा नेतृत्वाला संधी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा जिल्हा परिषद गट आता खुला झाल्याने, आमदारपुत्र गौतम अनिल पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी गटातील तरुणाई आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत नुकतेच उमेदवारी बाबत आ. पाटील यांना मागणीपत्र देण्यात आले आहे.
आ.अनिल पाटील व जयश्री पाटील यांचे सुपुत्र असलेले गौतम पाटील हे उच्चशिक्षित आहेत. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवल्यानंतर अमेरिकेतून कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचे उच्च शिक्षण घेतले आहे. मायदेशी परतल्यानंतर ते सध्या आपल्या कुटुंबाचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळत आहेत. काहीतरी नवीन करण्याची उमेद असलेले हे तरुण व्यक्तिमत्त्व कळमसरे जि.प. गटातून आपला राजकीय श्रीगणेशा करावा, असा गावागावातील युवा कार्यकर्त्यांचा प्रचंड आग्रह आहे. यासंदर्भात युवा पदाधिकारी आणि गटातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार अनिल पाटील यांना नुकतेच एक निवेदन सादर केले. यावेळी कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला की, उच्चशिक्षित आणि राजकीय वारसा असलेल्या गौतम पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात संधी दिल्यास, युवा कार्यकर्ते या संधीचे सोने करून दाखवतील आणि गट विक्रमी मताधिक्याने निवडून आणतील.
आमदार अनिल पाटील, जयश्री पाटील आणि गौतम पाटील यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आलेल्या या निवेदनाच्या वेळी राष्ट्रवादी सोशल मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, गौरव रावसाहेब पाटील, संग्राम पाटील, कल्पेश साळुंखे, योगेश पाटील, चेतन चौधरी, सचिन साळुंखे, ऋषिकेश पाटील, पीयूष वानखेडे, दर्शन सुर्वे, लोकेश झंवर, सनी पाटील यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.



