Home Uncategorized दिल्लीच्या पथकाने अडावद येथे घेतला जनगणनेचा आढावा

दिल्लीच्या पथकाने अडावद येथे घेतला जनगणनेचा आढावा


अडावद (ता. चोपडा)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अडावद गावात सुरू असलेल्या जनगणना 2027 पूर्वचाचणीला आज वेगळीच गती मिळाली, कारण दिल्ली येथून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देत संपूर्ण कामाचा सविस्तर आढावा घेतला. डिजिटल पद्धतीने होणाऱ्या आगामी जनगणनेतील तांत्रिक बाबी, अडचणी आणि स्थानिक प्रतिसाद यांचा प्रत्यक्ष निरीक्षणातून अभ्यास करण्यात आला.

२५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता उपमहारजीष्ट्रार वैशाली वराडे यांनी इंदिरानगर परिसरात जनगणना प्रगणक व पर्यवेक्षकांशी संवाद साधत घरयादी तसेच घरगणना पूर्वचाचणी (HLO) कामाची तपशीलवार माहिती घेतली. 2027 ची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल माध्यमातून होणार असल्याने या तंत्रज्ञानाच्या वापरातील अडथळे, इंटरनेटची उपलब्धता, अँपची कार्यप्रणाली आणि प्रत्यक्ष फील्डमधील अडचणी यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला.

महाराष्ट्रात सध्या केवळ तीन ठिकाणी जनगणना पूर्वचाचणी होत असून, त्यापैकी चोपडा तालुक्यातील २६ गावांची निवड करण्यात आली आहे. अडावद हे या महत्वाच्या चाचणी केंद्रांपैकी एक असल्याने अधिकारी वर्गाने संपूर्ण प्रक्रिया लक्षपूर्वक पाहिली. या चाचणीमधून मिळणाऱ्या अहवालावरून डिजिटल जनगणनेचे अंतिम स्वरूप ठरणार आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोबाईल अँपद्वारे घरयादी, घरगणना, नोंदी अद्ययावत करणे आणि सत्यापन या सर्व प्रक्रियांचा सखोल अभ्यास करून 2027 मधील राष्ट्रीय जनगणना अधिक सक्षम, अचूक आणि झिरो-एरर करण्याचे उद्दिष्ट आहे. स्थानिक प्रगणक व पर्यवेक्षकांनीही डिजिटल पद्धतीतील आपल्या अनुभवांची माहिती देत अडचणींची नोंद अधिकाऱ्यांना दिली.

या निरीक्षणावेळी महाराष्ट्र जनगणना सहायक निदेशक अजय ठाकुर, उपसहायक निदेशक सागर बागुल, मंडलाधिकारी अजय पावरा, तलाठी वीरेंद्र पाटील, प्रगणक पी. आर. माळी, एम. एन. माळी, एस. के. महाजन, एस. बी. चव्हाण तसेच इतर पर्यवेक्षक आणि प्रगणक उपस्थित होते. अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे जनगणना पूर्वचाचणी कार्याला अधिक गती मिळाली असून, स्थानिक प्रशासन व जनगणना कर्मचारी यांचा उत्साह आणखी वाढला आहे.

अंततः, अडावदमध्ये झालेली ही महत्त्वपूर्ण पाहणी आगामी डिजिटल जनगणनेच्या यशस्वीतेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.


Protected Content

Play sound