भुसावळ, प्रतिनिधी | दीपनगर येथे वीज केंद्रात नेहमीप्रमाणे कामासाठी गेलेला विजय वाकोडे हा कामगार आजपर्यंत परत न आल्याने तसेच यासंदर्भात पोलीस प्रशासन गांभीर्याने दखल घेऊन तपास करत नसल्याने तसेच संबंधित ठेकेदार उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने शोक संतप्त झालेल्या नातलगांनी लवकरच आमरण उपोषण करण्याचा इशारा आज (४ जुलै) एका पत्रकार परिषदेत दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पत्नी, आई व दोन मुलांसह झोपडपट्टीत राहणारा विजय वाकोडे हा हातमजुरी करणारा कामगार दीपनगर येथील आर.आर. वनवे (रा.फेकरी) या ठेकेदाराकडे गेल्या काही वर्षांपासून रोजंदारीने कामाला होता. गेल्या ११ फेब्रुवारी २०१९ रोजी तो नेहमीप्रमाणे डबा घेवून कामाला गेला तो आजतागायत परतलेला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याची वारंवार ठेकेदाराकडे चौकशी केली, मात्र त्याच्याकडून उडवा-उडवीची उत्तरे मिळाली. तसेच विजयाच्या सह कामगारांनीही याबाबत भीतीपोटी काहिही बोलण्यास नकार दिला. या घटनेबाबत नातलगांनी पोलिसांकडे धाव घेतली असता त्यांनी हरवल्याची नोंद केली मात्र विजयचा तपास लावण्याचा गांभीर्याने प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही.
याशिवाय विजयचे नातलग, राष्ट्रवादी ट्रेड युनियन व कामगार संघटना प्रतिनिधी यांनी नुकतीच जिल्हाधिकारीढाकणे यांची भेट घेवून त्यांना एक निवेदन दिले आहे. विजयच्या कुटुंबीयांना त्याचा घातपात झाला असल्याची शंका येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून विजयचा शोध लावावा, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेत वाकोडे कुटुंबीयांसह कामगार नेते जे.एम. वराडे, भरत पाटील, शांताराम जाधव, नरेश वाघ, भगवान निरभवणे, अंजना निरभवणे व सिद्धार्थ सोमवंशी उपस्थित होते.