अंजनविहरे व वाकटुकी येथे आरओ प्लांटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील अंजनविहरे व वाकटुकी येथे आर.ओ. प्लांटचे उदघाटन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, ८० % आजार हे अशुद्ध पाण्यामुळेच होत असतात त्यामुळे पिण्याचा पाण्याची योग्य तपासणी करूनच पाणी पिणे योग्य आहे. सदृढ आरोग्यासाठी शुद्ध पाणी काळाची गरज असून सोशल डिस्टसिंग, मास्क व हात स्वच्छ धुणे ही त्रिसूत्री उपयुक्त असून सर्वांनी याचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

यावेळी ना.गुलाबराव पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले. अंजन विहीरे व वाकटूकी परिसरातील शेतकर्‍यांसाठी अंजनी प्रकल्पातून पाठ चारीचे काम मंजूर करणार असून शेती रस्त्यांना भविष्यात प्राधान्य देणार आहे. धार ते खामखेडा, रेल फाटा ते रेल, या रस्त्यांच्या कामांना ग्रामस्थांनी केलेल्या मागणी नुसार मंजूरी देणार असल्याचे सांगितले तसेच गाव विकासासाठी व गावात शांतात प्रस्तापित करण्यासाठी शेतीच्या बांधावरून तक्रारी न करता एकमेकांना सामंजस्याने सहकार्य करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जि.प. सदस्य गोपाल चौधरी, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांची एकजूट महत्वाची असून माझे कुटुंब – माझी जबाबदारी या शासनाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

दरम्यान, अंजन विहीरे व वाकटूकी गावासाठी रवींद्र चव्हाण, ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या मागणी नुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावासाच्या विविध विकास कामाकरिता अंजन विहीरे व खामखेडा रस्त्यालगत झिरी नदीवरील पुलाचे काम, स्मशान भूमी बांधकाम, शाळेचे वाल कंपाउंड, ग्राम पंचायत कार्यालय, शेत रस्ते, वाटर कुलर तसेच अंजन विहीरे फाटा ते धार या २.५ कि.मी. रस्त्याचे डांबरी करणाची कामे मंजूर केले यासाठी सुमारे ४ कोटी रुपयांच्या निधी दिल्याबद्दल ग्राम पंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, शेतकरी व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार केला. यावेळी ग्रामस्थांच्या प्रेमाने ना. गुलाबराव पाटील भारावून गेले.

यावेळी शिवसेनेचे जिल्ह्य प्रमुख गुलाबराव वाघ, प.स. सभापती मुकुंदराव नन्नवरे, जि.प. सदस्य गोपाल चौधरी, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, प्रभारी गट विकास अधिकारी श्री चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री देसले, वाकटुकी सरपंच भागाबाई पाटील, अंजन विहीरे सरपंच डॉ. विलास चव्हाण, उप सरपंच उमेश पाटील,ग्रा.प. सदस्य गणेश पाटील, महेश पाटील, भरत पाटील, रवि चव्हाण सर, चांदसर चे सरपंच सचिन पवार, पोलीस पाटील, तालुका कृषी अधिकारी दिपक माळी, वाकटूकी शाखा प्रमुख रामकृष्ण पाटील,रवींद्र पाटील, गोपाल पाटील, तलाठी महेंद्र वंजारी, डी.ओ. पाटील, उप तालुका प्रमुख मोतीलाल पाटील, ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष पंजाबराव पाटील, ग्रामसेवक अनिल पाटील, रोहिदास पाटील, खंडेराव पाटील, मुरलीधर पाटील यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष पंजाबराव पाटील व रवि चव्हाण यांनी केले तर आभार ग्रामसेवक अनिल पाटील यांनी मानले.

Protected Content