जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुंतवणूकीत नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अज्ञात दोन महिलांनी जळगाव जिल्ह्यातील भालोद येथे राहणाऱ्या शेतकऱ्याची ५ लाख ६५ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात व्हॉटसॲपधारक अज्ञात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव सायबर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील भालोद येथे राहणारे शेतकरी कांचनकुमार सुधाकर पिंपळे (वय-४७) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. एप्रिल २०२३ मध्ये त्यांना व्हॉसट्ॲपच्या एका अनोळखी नंबरवरून फोन आला. यातील लक्ष्मी आणि संजना अशी दोघांनी नावे सांगितली. त्यांनी इगल व्हू ट्रेडींग नावाच्या व्हॉटसॲप गृप तयार केला. त्यांनी शेतकऱ्याला गुंतवणूकीचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. त्यानंतर या स्कीमध्ये पैसे गुंतविण्याचे सांगून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. शेतकऱ्याने विश्वास ठेवून वेळोवेळी त्यांनी सांगितलेलया बँक खात्यात एकुण ५ लाख ६५ हजार रूपये पाठविले. परंतू त्यांना अद्यापपर्यंत कोणताही नफा मिळाला नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी कांचनकुमार पिंपळे यांनी शनिवारी २ सप्टेंबर रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ५ वाजता अव्हॉटसॲपधारक अज्ञात दोन महिलांविरोधात जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक बी.डी.जगताप करीत आहे.