जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील शेतकरी होरपळला असून जिल्ह्यात ओला दुष्काळ ताबोडतोब जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर हेक्टरी ५० हजार रुपये त्वरित मदत देऊन सरसकट कर्ज माफी द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. याप्रसंगी ललित बागुल, सलीम इनामदार, रोहन सोनवणे आदी उपस्थित होते.
रवींद्र पाटील हे पुढे म्हणाले की, शेतकऱ्याची परिस्थिती ही फार चिंताजनक झाली आहे. त्यांना सरकट कर्ज माफी देण्यात यावी. वीज बिल संपूर्ण माफ करण्यात यावे. गुरांना कोरडा चारा खायला नसून पाणी साचल्याने शेत मजुरांना काम नसल्याने दिवाळी अंधारात गेली. भविष्य अंधारमय झाले आहे. रब्बी पिकांचे नियोजन होत नाही. जर नियोजन झाले तर राज्य सरकारतर्फे मोफत बियाणे , खते देण्यात यावीत. त्वरित रब्बी हंगामासाठी कर्ज पुरवठा करण्यात यावा. आज जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात पीक परिस्थिती चांगली नाही. ओला दुष्काळ आहे, दररोज पाऊस पडतोय, शेतकऱ्यांना काम नाही. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कोणताही आधार, दिलासा देण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यात व केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार असतांना आपत्ती व्यवस्थापन त्याच्याकडे असतांना ताबोडतोब हवाई पाहणी करून केंद्र सरकार मदत पाठावू शकत होत. परंतु, अद्यापही त्यांनी मदत पाठविली नसल्याचा आरोप करत केंद्र सरकारचा देखील यावेळी पाटील यांनी निषेध केला.