पाचोरा, प्रतिनिधी | कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूण शेतकऱ्याने शेतात ‘किटकनाश औषधी’ सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना टाकळी येथील शेतात घडली आहे.
नगरदेवळा ता.पाचोरा येथून जवळच असलेल्या टाकळी येथील शेतकरी रमेश नामदेव महाजन (वय – ३८) यांनी किटकनाश औषधी’ सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार, दि.१९ जानेवारी रोजी घडली आहे. शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी, कधी कोरडा व ओला दुष्काळ यामुळे शेतीतील त्याचे उत्पन्न घटले. त्यातच बँकेचे कर्ज परत करण्याचे संकट, शेतात दुबार पेरणी केली. मात्र पुन्हा अतिवृष्टीमुळे हातचे पीक गेले. आता घरखर्च व बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तो मागील काही दिवसांपासून राहत होता. यातूनच त्याने आपल्याच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
आपल्याच शेतात विषारी औषध प्राशन करून घरी आल्यावर ते जागेवरच कोसळले. त्यांना उपचारासाठी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. शेतकरी रमेश नामदेव महाजन यांच्यावर चाळीसगाव येथील आय.सी.आय.सी.आय.बैंक शाखा चाळीसगाव यांचे ४ लाख ५० हजार रुपये इतके कर्ज थकीत असल्याची आणि त्या कर्ज फेडीच्या नैराश्यातूनच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याची चर्चा होत आहे. त्यांच्या पश्चात वृध्द आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, असा परिवार आहे.