जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भरधाव वेगाने जाणार्या कारने दिलेल्या धडकेत महिलेसह तिची दोन्ही मुले आणि त्या महिलेचा भाचा अशा चौघांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, जळगाव ते पाचोरा मार्गावर असलेल्या रामदेववाडी येथे काल सायंकाळी भीषण दुर्घटना घडली. शिरसोली येथील रहिवासी असलेल्या राणी उर्फ वत्सलाबाई सरदार चव्हाण (वय 30 ) या मंगळवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास आपल्या एमएच. १९.ईई. ८९२५ क्रमांकाच्या दुचाकीने शिरसोलीकडे जात होत्या. दरम्यान, रामदेववाडी गावाच्या पुढील घाटाच्या जवळच जळगावकडून एमएच. १९.सीव्ही. ६७६७ या क्रमांकाची कार भरधाव वेगाने आली. या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये राणी सरदार चव्हाण यांच्यासह त्यांचा मुलगा सोहम वय ७, सोमेश (वय ४) हे जागीच ठार झालेत. तर लक्ष्मण भास्कर राठोड ( वय १६, रा. लोंढ्री ता. जामनेर ) याचा उपचार सुरू असतांना रात्री उशीरा मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती कळताच सरदार चव्हाण आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे कारमध्ये गांजा आढळून आल्यामुळे लोक संतापले. संतप्त जमावाने अपघात करणार्या चारचाकीसह तरुणांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या चारचाकी क्रमांक एमएच.१९.सीजे.११७७ ची देखील तोडफोड केली. तसेच, याप्रसंगी कारमध्ये असणार्या तिघांचा चोप देखील देण्यात आला. एमआयडीसी पोलिसांसह एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी पोहचल्याने येथील वातावरण आटोक्यात आले.
दरम्यान, या अपघातातील मृतांच्या आप्तांनी केलेल्या आक्रोशामुळे उपस्थितांचे मन हेलावले. या काल चालकांपैकी एक जण हा बड्या व्यक्तीचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.