हल्ल्यातील तिसऱ्या जखमीचा मृत्यू : कंडारीतील मृतांची संख्या ‘तीन’वर

भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता निर्घृण हत्या करण्यात आली  या प्रकरणात गंभीर जखमी झालेला रमेश अशोक इंगळे (वय-३२) या तरुणाचा देखील उपचारादरम्यान रविवारी ३ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शांताराम भोलानाथ साळुंखे हा गावातील पान टपरीजवळ उभा असताना गावातील राहणारा दीपक छगन तायडे यांच्याकडे पाहिले याचा राग आल्याने दीपक तायडे याने शांताराम साळुंखे याला शिवीगाळ केली. ही घटना शांताराम साळुंखे यांनी घरी जाऊन राकेश साळुंखे, विकास साळुंखे आणि रमेश इंगळे यांना सांगितले. त्यानंतर हे सर्वजण पानटपरी जवळ जाऊन माझ्या भावाला का शिवीगाळ केली, अशी विचारणा विकास साळुंखे यांनी केली.  त्यावरून वाद निर्माण झाला, या वादात विकास चंद्रकांत साळुंखे, रमेश अशोक इंगळे, शांताराम भोलानाथ साळुंखे (वय-३२) आणि राकेश भोलेनाथ साळुंखे (वय-३०) या चौघांवर संशयित आरोपी दीपक छगन तायडे, मनोज श्रावण मोरे, अमोल कोळी, मयूर कोळी, देवा भिल, किरण सपकाळे यांच्यासह सोबत असलेले इतर ४ जणांनी तिक्ष्ण हत्यार, चॉपर, लोखंडी पाईप, दगड, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात शांताराम साळुंखे आणि राकेश साळुंखे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांना ठार केले. तसेच या मारहाणीमध्ये विकास साळुंखे आणि रमेश इंगळे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने भुसावळ ट्रामा सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान यातील गंभीर जखमी असलेला रमेश अशोक इंगळे यांच्या देखील रविवार 3 सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता प्राणज्योती मालविली.

खुनाची घटना समोर आल्यानंतर जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

भुसावळ तालुक्यातील या घटनेमुळे गुन्हेगारीमधील वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात विकास साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक तायडे, मनोज मोरे, अमोल कोळी, मयूर कोळी, देवा भिल, किरण सपकाळे यांच्यासह सोबत असलेले कंडारी गावातील अनोळखी ४ जण यांच्या विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन करीत आहे. या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Protected Content