आदिवासी बालकाचा मृत्यू; कुटुंबीय मात्र मदतीच्या प्रतीक्षेत

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वड्री धरण परिसरातील आदिवासी बालकाचा कुपोषणाने मुत्यु झाला. याप्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, सावखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, डॉ. राहुल गजरे यांनी भेटी देऊन पिडीत कुटुंबाची  चौकशी केली केल्याचे वृत्त आहे. मात्र, यासंदर्भात विचारणा केली असता अशा कुठल्याही प्रकारची मदत, चौकशी किंवा माहीती घेण्यासाठी कुणी आले नसल्याचे सांगण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश जवानसींग पावरा असे मृत बालकाचे नाव आहे. दरम्यान, काही महिला आल्या व त्यांनी चौकशी करून गेल्याचे वृत्त आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने चौकशीअंती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. बऱ्हाटे यांनी सांगितले आहे. 

कुपोषणामुळे बालकाच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरला असून तालुक्यात कुपोषणग्रस्तांचा पुर्नर्सव्हेक्षण झाल्यास अनेक धक्कादायक प्रकार समोर येण्याची शक्यता आहे.  दरम्यान, सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वड्री धरण परिसरात काही सामाजिक संस्थांनी जाऊन आदिवासी कुटुंबियांना मदतीचा हात समोर केला आहे.  कुपोषणामुळे आठ महिन्याचा बालक मरण पावल्याच्या घटनेमुळे संपुर्ण जळगाव जिल्ह्यात  सर्वत्र एकच खळबळ उडाली. आदिवासी एकात्मिक प्रकल्प विभाग, जिल्हा परिषदचे महिला व बालविकास विभाग कार्यालय व आरोग्य यंत्रणा यांच्या माध्यमातून  तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या योजनांचा बट्टयाबोळ झाला आहे.  या कुपोषणग्रस्त बालकाच्या मृत्युच्या विषयाची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे.

दरम्यान, वरिष्ठ पातळीवर या संदर्भात सविस्तर अहवाल मागवण्यात येत असल्याची माहीती प्राप्त झाली आहे.  स्थानिक पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आदिवासींच्या वास्तव्याबाबत चुकीची व दिशाभुल करणारी माहीती वरिष्ठांना पाठवुन आपला कसा या गंभीर प्रकरणातून सुरक्षीत बचाव होईल, याच प्रयत्नात तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणा लागली असल्याचे दिसुन येत आहे.  या संदर्भात जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी या विषयाला गांर्भीयाने घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Protected Content