अमळनेर गजानन पाटील | बोरी नदीला आलेल्या पूरामुळे नदी ओलांडून उपचारासाठी नेण्यात विलंब झाल्याने एका आदिवासी बालिकेचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील सात्री येथे घडली आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलीचा जीव गेल्याचा आरोप करत तिच्या कुटुंबाने मृतदेह प्रांत कार्यालयात आणून या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल केल्याशिवाय तिचे अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा कुटुंबासह ग्रामस्थांनी धरला आहे.
याबाबत वृत्त असे की, गेल्या चार-पाच दिवसापासून तामसवाडी धरणाचे १५ दरवाजे काही क्षमतेने उघडण्यात आले आहेत. परिणामी नदीकाठावरील सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंरतु असे असले तरी आजही काही गावे अशी आहेत की त्या ठिकाणी पूर स्थिती निर्माण झाली तर शर्तीचे प्रयत्न देखील फोल ठरतात. असच काहीसे अमळनेर तालुक्यातील सात्री येथील १३ वर्षीय आरुषी च्या बाबतीत गावकरी व तालुक्याला प्रत्येयास आले.
तालुक्यातील सात्री येथील आरुषी सुरेश भिल (वय-वर्ष १३) ही बालिका दोन दिवसापासून तापाने फणफणत होती.बोरी नदीला पूर आल्याने साहजिकच तिला घेऊन तिचा कुटुंबाला नदी ओलांडून जाणे शक्य झाले नाही. बोरी नदीला जास्त पाणी असल्याने मुलीला दवाखान्यात नेता आले नाही. तर, डॉक्टरांना देखील गावात येणे शक्य नाही. मंगळवारी सकाळी आरुषी अस्वस्थ वाटू लागले, अशातच अधिक ताप वाढल्याने नदी काठावर आणीत गावकर्यांच्या मदतीने धाडस केले. तिला खाटेवर बसवून नदी ओलांडून दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे म्हणून प्रयत्न करीत असतानाच तिचा झटका तेथेच तिचा मृत्यू झाला.लेक वाचावी म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून, चार-पाच जणांच्या साहायाने टायरच्या ट्यूब व खाटेचा आधाराने नदी पार करीत रुग्णालय गाठले. मात्र दुर्दैव ! डॉक्टरांनी तपासले असता तिला मृत घोषित केले.
सात्री हे गाव निम्न तापी प्रकल्पात पुनर्वसित गाव आहे.आठ वर्षांपासून या गावाचे पुनवर्सनाचे काम रखडलेल्या स्वरूपात आहे. गेल्या आठवड्यात अप्पर जिल्हाधिकारी,पुनर्वसन अधिकारी यांनी या गावास भेट दिली होती. प्रामुख्याने, यावेळी येथील माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी पुढील दूरदृष्टी चा प्रत्येय बोलून दाखवला होता. मात्र निर्गगठ्ठ प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेतला नाही. म्हणुनच आज ही वेळ आली आहे;असा संतप्त सवाल गावकर्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, आरूषीचा मृत्यू झाल्याने परिसरातून संतापाची लाट उसळली आहे. तिला वेेळेत छपचार न भेटल्याने तिने दम तोडल्याने संतप्त ग्रामस्थानी आरुषीचे शवविच्छेदन झालेले प्रेत प्रांत कार्यालयात आणले.याप्रसंगी निगरगट्ट शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत शासनाचा चुकीच्या धोरनामुळे अजुन किती जनांचा जीव घ्याल असा संतप्त सवाल यावेळी येथील पुनर्वासन समिती प्रमुख महेंद्र बोरसे यानी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना केला. यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ ही उपस्थित होते. यावेळी भरपावसात मृतदेह प्रांत कार्यालयात, प्रांत अधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार यांना पुनर्वसन समितीचे सदस्य महेंद्र बोरसे यांनी जबाबदार प्रशासना विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.