जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुल सर्वेक्षणाची अंतिम मुदत वाढवून ३१ मे पर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी मंगळवारी २० मे रोजी दुपारी २ वाजता दिली आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपले सर्वेक्षण तातडीने पूर्ण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
नऊ वर्षांनंतरचा महत्त्वाचा सर्व्हे
सीईओ मिनल करणवाल यांनी यावेळी सर्वेक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की, “हा सर्व्हे जवळपास नऊ वर्षांनंतर होत आहे. भविष्यात घरकुल योजनेअंतर्गत जे काही उद्दिष्ट निश्चित केले जाईल, त्यासाठी याच सर्वेक्षणाची यादी वापरली जाईल. त्यामुळे, जे नागरिक अद्याप सर्वेक्षणात सहभागी झालेले नाहीत, त्यांनी हे काम गांभीर्याने घ्यावे.”
सरपंच आणि ग्रामसेवकांना पुढाकार घेण्याचे आवाहन
या सर्वेक्षणासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत: नागरिक स्वतः ‘सेल्फ सर्व्हे’ (Self Survey) करू शकतात किंवा ग्रामसेवकांमार्फतही आपले सर्वेक्षण पूर्ण करून घेऊ शकतात. दोन्ही पर्याय सोपे असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. मिनल करणवाल यांनी विशेषतः सरपंच आणि ग्रामसेवकांना या कामात पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. “सरपंचांनी यात विशेष लक्ष घालावे, कारण ही यादीच आपल्या गावांतील गरजू घरांसाठी भविष्यात आधार ठरेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मुदतवाढीचा फायदा घ्या
यापूर्वी सर्वेक्षणाची अंतिम मुदत १५ मे होती, ती आता वाढवून ३१ मे २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे, जे गावकरी अद्याप सर्वेक्षणापासून वंचित राहिले आहेत, त्यांना ही एक चांगली संधी आहे सरपंच, ग्रामसेवक आणि सर्व गावकरी बांधवांनी हे सर्वेक्षण पूर्णपणे करून घ्यावे, जेणेकरून एकही पात्र कुटुंब घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नाही. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी केले आहे.