दहावी, बारावी पुरवणी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या पुरवणी परिक्षांच्या तारखा आज जाहीर केल्या आहेत.

कोरोनाच्या आपत्तीमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पर्यायी मूल्यांकन धोरणानुसार बोर्डानं निकाल जाहीर केले होते. या निकालामध्ये उत्तीर्ण न झालेले विद्यार्थी आणि ए.टी.के.टी. साठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. याबाबत आज शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घोषणा केली आहे.

यानु६सार दहावीची परीक्षा बुधवारी २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे. इयत्ता दहावीची प्रात्याक्षिक आणि तोंडी, श्रेणी परीक्षा २१ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेतली जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांनी यासंदर्भात त्यांच्या शाळेशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या सर्वसाधारण अभ्यासक्रमांची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल. या शिवाय बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा १६ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात येईल. तसेच बारावीची प्रात्याक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा १५ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या दरम्यान घेतली जाईल.

Protected Content