पाचोरा, प्रतिनिधी । एकीकडे माणुस माणसाला होत नसल्याचे चित्र आपणास सर्वत्र बघावयास मिळते. परंतु वनप्राण्याविषयीची असलेली कृतज्ञता तालुक्यातील बाळद बु येथील ग्रामस्थांनी दाखवत ६ जानेवारी २०२१ रोजी मृत्युमुखी पडलेल्या वानराचे विधीवत अंत्यसंस्कार करुन तसेच दुखवटा पाळत १५ जानेवारी रोजी दशक्रिया विधी व १६ जानेवारी रोजी उत्तरकार्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी लहान बालकांसह सुमारे १५० नागरिकांनी मुंन्डन करुन तमाम जनतेसमोर एक आगळा वेगळा आदर्श ठेवला आहे.
तालुक्यातील ८ हजार लोकसंख्या असलेले बाळद बु” हे गाव असुन गावातील बहुतांशी नागरिक हे परंपरागत शेती व्यवसाय करतात. बाळद गावा लगत मध्य रेल्वे लाईन असुन येथील शेतकरी शरद वाणी यांचे शेत हे रेल्वे लाईन जवळच आहे. दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास वानरांचा एक कळप रेल्वे लाईन क्रॉस करत असतांनाच एका वानरास रेल्वे गाडीचा धक्का लागल्याने वानराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सदर घटनेची माहिती गावातील बाळद वासियांना कळल्यानंतर सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन मयत झालेल्या वानर राजाचे विधीवत अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. याकरिता आप आपल्या कुवतीनुसार लोक वर्गणी जमा करण्यात आली. जमा झालेल्या पैशातुन वानराचे विधिवत पुजन ट्रॅक्टर फुल हारांनी सजवत वाजंत्री लावुन गावातुन अंत्ययात्रा काढण्यात आली होती. व मृत वानरास अखेरचा निरोप देत घटनास्थळा पासुन नजीकच असलेल्या शरद वाणी यांचे शेतात पुरण्यात आले आहे.
वानराचा दशक्रिया विधी, उत्तरकार्य व अन्नदान
एखाद्या मनुष्याच्या मृत्यूनंतर होणाऱ्या विधी प्रमाणेच सदरील मयत झालेल्या वानराचा दि. १५ जानेवारी रोजी दशक्रिया विधी व उत्तर कार्याचा कार्यक्रम दि. १६ जानेवारी रोजी करून संपूर्ण गावास अन्नदान करण्यात आले. बाळद वासियांच्या या वनप्राण्याविषयीची आत्मीयता बघुन ग्रामस्थांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
घटनास्थळापासुन काहीच अंतरावर मयत वानराच्या मुर्तीची प्रतिष्ठापना
६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बाळद ता. पाचोरा येथील शेतकरी शरद वाणी यांचे शेतालगत रेल्वे गाडीचा धक्का लागुन वानर मृत्यूमुखी पडले होते. शरद वाणी यांचे सह ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा करून वानराची ट्रॅक्टर मधुन विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तसेच १५ रोजी दशक्रिया विधी व १६ रोजी उतरकार्य, अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला. व वानराची सुमारे ९० किलो वजनाची संगमरवरीची मुर्ती बनवुन मुर्तीची गावातुन ट्रॅक्टरवर भव्य मिरवणूक काढण्यात आली. व वानराच्या मुर्तीची घटनास्थळा नजीक असलेल्या शरद वाणी यांच्या शेतात विधीवत मुर्तीची प्रतिष्ठापना यावेळी करण्यात आली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/739360443608705