मुंबई वृत्तसंस्था । ‘आयपीएल 2020’ मधील ‘मुंबई इंडियन्स’मध्ये मालवणचा झील दर्शन बांदेकर याची वर्णी लागली आहे. ‘स्पीडस्टार’ अशी ओळख असलेल्या दर्शन बांदेकरची मुंबई इंडियन्सच्या ३५ जणांच्या संघात निवड झाली आहे.
दुबई येथील आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना नेट्समध्ये फलंदाजाची सराव देण्यासाठी दर्शन बांदेकर या वेगवान गोलंदाजीची निवड करण्यात आली आहे. २१ ऑगस्ट रोजी दर्शन बांदेकर मुंबई इंडियन्सच्या चमूसह दुबईला प्रयाण करणार आहे.
दर्शनच्या गौरवास्पद कामगिरीबद्दल क्रीडा रसिकांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. दर्शनच्या निवडीमुळे त्याचे कुटुंबीय आणि चाहतेही भारावून गेले आहेत.
दर्शन बांदेकर हा मूळ देवबाग येथील रहिवासी आहे. दर्शन बांदेकरचे शालेय शिक्षण डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग येथे झाले. त्यानंतर त्याने अकरावी व बारावीचे शिक्षण नाशिक येथे पूर्ण केले.
दर्शनला लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे. वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. वेगवान गोलंदाजी हे दर्शनचे प्रभावी अस्त्र आहे. आता ‘आयपीएल 2020’ मधील ‘मुंबई इंडियन्स’च्या संघात दर्शनचे दर्शन प्रत्यक्ष मैदानात होणार का, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.