उत्तर प्रदेशात डॉक्टर तरुणीची निर्घृण हत्या, संशयित आरोपीस अटक

लखनऊ वृत्तसंस्था । एमडीचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीच्या हत्याकांडाने उत्तर प्रदेश हादरले आहे. आग्रा येथील सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमध्ये एमडी करणारी डॉक्टर योगिता गौतम हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणात एका संशयित डॉक्टरला ताब्यात घेतले आहे.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर ही बातमी पसरली तेव्हा एसएन मेडिकल कॉलेजचे सहकारी डॉक्टरांना धक्काच बसला. एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या डॉक्टर योगिता गौतमची डोके चिरडून हत्या करण्यात आली. बमरौली कटारा भागात बुधवारी तिचा मृतदेह सापडला. मृतदेहाचे डोके आणि पोटावर वजनदार लाकूड ठेवले होते. पोलिस दिवसभर तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी डॉक्टर योगिता गौतम देखील बेपत्ता होती. एसएन मेडिकल कॉलेजजवळील राजमुंडी येथे राहुल गोयल यांच्या घरात ती भाड्याने राहत होती. त्या आधारे संध्याकाळी उशिरा तिची ओळख पटली.

योगिता ही दिल्लीतील नजबगडची रहिवासी होती. पोलिसांसमोर मोठा प्रश्न असा आहे की एसएन मेडिकल आणि राजामुंडी हे केवळ एक किलोमीटरच्या अंतरावर आहेत, मग डॉ. योगिता फतेहाबाद रोडवरील डौकी पोलिस स्टेशन भागात कशी पोहोचली. या खुनामागे एखाद्या परिचित व्यक्तीचा सहभाग असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

योगिता मंगळवारी संध्याकाळपासून बेपत्ता होती. कुटुंबियांच्या तक्रारीनुसार एमएम गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जालौन पोलिसांनी आरोपी डॉ. विवेक तिवारी यांना ताब्यात घेतले आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार आरोपी डॉक्टर योगिताला त्रास द्यायचा आणि धमकावतही होता. आरोपी डॉ. विवेक तिवारी यांची कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हत्येमध्ये वापरलेली गाडी व इतर साहित्य जप्त करण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

Protected Content