भुसावळातील खड्डे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सज्ज ( व्हिडीओ )

bhusawal road

भुसावळ प्रतिनिधी । आज मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेनिमित्त भुसावळात येत असून त्यांच्या स्वागतासाठी शहरातील खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनाने केला असला तरी बर्‍याच ठिकाणी हा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे भुसावळ शहरातील खड्डे हे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

याबाबत वृत्त असे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्त आज भुसावळ शहरात येत आहेत. गत काही महिन्यांमध्ये मुख्यमंत्री दुसर्‍यांदा शहरात येत आहेत. तथापि, शहरातील स्थितीमध्ये फारसा बदल झालेला नाही. उन्हाळ्यात भयंकर पाणी टंचाईमुळे भुसावळकरांना अक्षरश: वणवण भटकावे लागले होते. तर पावसाळ्यात शहरातील रस्त्यांचा अक्षरश: चाळणी झालेली आहे. यामुळे सर्वसामान्य भुसावळकरांचे शिव्याशाप सत्ताधार्‍यांना ऐकावे लागत आहेत. यातच कामे होत नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या सभेत आमदार संजय सावकारे यांचे कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी हे थेट नगराध्यक्ष रमण भोळे यांना भिडल्याचे शहरवासियांनी पाहिले. या तमाशामुळे शहरवासियांचे मनोरंजन होत असतांनाच आज मुख्यमंत्र्यांचे आगमन होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या समोर शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था दिसू नये म्हणून नगरपालिका प्रशासन काही दिवसांपासून कामाला लागले आहे. मुख्यमंत्र्यांचे आगमन आणि निर्ममनाच्या मार्गावरील रस्त्यांमधील खड्डे तातडीने बुजण्यात आले आहेत. मात्र घाईघाईत केलेल्या या कामात अनेक त्रुटी झाल्या असून यामुळे सत्ताधार्‍यांचे पितळ उघडे पडले आहे. या रस्त्यांवरील बरेच खड्डे अजून जैसे थे या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नगरपालिकेची मलमपट्टी फोल ठरल्याचेही स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या निमित्ताने का होईना निगरगट्ट राजकारण्यांना जाग आल्यामुळे काही नागरिकांनी तिरसट प्रतिक्रिया दिल्या आहेत. मोठ्या आशेने भुसावळकरांनी प्रस्थापितांना कौल देऊन आमदार संजय सावकारे यांच्या बाजूने मतदान केले होते. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांनाही भुसावळकरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. तर राजकारणी पुन्हा एकदा भूलथापा देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

पहा : भुसावळातील दयनीय अवस्थेबाबतचा हा वृत्तांत.

Protected Content